Saturday 11 August 2012

सर्वश्रेष्ठ प्रशासक - महाराणी अहिल्याबाई होळकर


सर्वश्रेष्ठ प्रशासक
-प्रा. हरी नरके,
कृषीवल, रविवार मोहोर, 3 जून 2012
महाराष्ट्राने आधुनिक काळात देशाला अनेक उत्तम प्रशासक दिले आहेत. ही परंपरा आपण इतिहासातून घेतलेली आहे. अठराव्या शतकातील सर्वश्रेष्ठ प्रशासक म्हणून गौरविल्या गेलेल्या अहिल्याबाई होळकर यांची आपण गेल्या गुरूवारी 287वी जयंती साजरी केली. इंग्रज इतिहासकारांनी अहिल्याबाई होळकर या संपूर्ण भारतातील 18व्या शतकातील सर्वश्रेष्ठ प्रशासक होत्या, असे सार्थ वर्णन केले आहे.
होळकर घराणे मूळचे फलटणजवळच्या होळ गावचे, म्हणून ते होळकर.  या घराण्यातील आद्य थोर योद्धे मल्हारराव होळकर यांचा जन्म सन 1693च्या मार्चमध्ये झाला. मराठा राज्यामध्ये त्यांचा विशेष दरारा होता. मल्हारराव हे धूर्त मुत्सद्दी राजकारणी होते. भाऊसाहेबांची बखर या ग्रंथात त्यांच्या चरित्रातील एक मार्मिक प्रसंग वर्णिलेला आहे. पेशव्यांनी शिंद्यांना तातडीचा खलिता पाठवला, ज्यात होळकरांना सोबतीला घेऊन रोहिल्यांना खतम करण्याचा आदेश दिला होता. शिंदे मल्हाररावांना भेटले आणि त्यांनी तातडीने युद्धभूमीवर येण्यासाठी विनंती केली. मल्हारराव त्यांना म्हणाले, शिंदे, तुम्हाला राजकारण कळत नाही. रोहिले मेले तर, पुण्याचे पेशवे तुम्हा-आम्हांस धोतरे बडवावयास भांडी घासावयास ठेवतील. लक्षात ठेवा, शत्रू जिवंत आहे, तोवरच धन्याला तुमची-आमची किंमत आहे.
सन 1723मध्ये मल्हाररावांना खंडेराव हा मुलगा झाला. चौंडी गावचे माणकोजी शिंदे यांचे पोटी 31 मे 1725 रोजी अहिल्याबाईंचा जन्म झाला. वयाच्या आठव्या वर्षी त्यांचे खंडेरावांशी लग्न झाले आणि त्या मल्हाररावांच्या सून बनल्या. 17 मार्च 1754 रोजी कुंभेरीच्या लढाईत खंडेरावांचा मृत्यू झाला. अहिल्याबाई विधवा झाल्या. खंडेरावांच्या मृत्यूनंतर मल्हाररावांनी सूनेलाच मुलगा मानले. त्या मल्हाररावांच्या मार्गदर्शनाखाली तयार झाल्या. अहिल्याबाईंना मालेराव आणि मुक्ताबाई ही दोन मुले होती. मल्हारराव आणि अहिल्याबाई, हे नाते सासरा-सुनेचे असले तरी ते तिहेरी होते. 1) गुरू-शिष्य, 2) बाप-लेक, 3) स्वामी-सेवक.
लढवय्ये मल्हारराव 20 मे 1766 रोजी मृत्यू पावले. त्यानंतर राज्यकारभाराची सगळी सूत्रे अहिल्याबाईंकडे आली. त्यानंतर पुढे सुमारे 30 वर्षे अहिल्याबाईंनी राज्यकारभार केला. इंदूर ही मल्हाररावांची राजधानी होती. अहिल्याबाईंनी मात्र ती तेथून नर्मदाकाठच्या महेश्वरला हलविली.
अहिल्याबाई- द्रष्ट्या प्रशासक :
अहिल्याबाईंची प्रतिज्ञा होती की, माझे कार्य माझ्या प्रजेला सुखी करणे हे आहे. माझ्या प्रत्येक कृतीला मी स्वतः जबाबदार आहे. सत्तेच्या अधिकारामुळे येथे मी जे जे काही करीत आहे, त्या प्रत्येक कृत्याचा जाब परमेश्वर मला विचारणार आहे. परमेश्वराने ज्या जबाबदाऱ्या माझ्यावर सोपविल्या आहेत, त्या साऱ्या मला पार पाडावयाच्या आहेत.
अहिल्याबाईंचा प्रत्येक लहानसहान व्यवहारही प्रजेचे हित बघून होत होता. त्याचे शेकडो कागदोपत्री पुरावे आज उपलब्ध आहेत. आपला प्रदेश मक्त्याने देताना त्या पुढीलप्रमाणे अटी घालत असत. 1) रयत राजी राखणे 2) राज्य समृद्ध करणे 3) नेमणुकी खर्चाच्या मर्यादेतच खर्च करणे 4) लष्कराने पायमल्ली केल्यास कठोर दंड केला जाईल. 5) अफरातफर झाल्यास कडक शिक्षा केली जाईल.
अहिल्याबाई स्वतः न्यायनिवाडे करीत. प्रश्न सोडवित. पडीक जमिनी लागवडीखाली आणीत. शेतात विहीरी खोदून देत. सरकारी हिशोब स्वतः तपासून एकेक खाते सोलून बघत. अहिल्याबाईंनी प्रत्येक विभागाची आणि शाखेची नव्याने रचना केली. शेतसारा आणि करवसुलीची पद्धत बदलली. नवी घडी बसविली. नवे कायदे केले. त्या शेतकऱ्यांना वार्षिक 12 टक्के दराने शेतीसाठी कर्ज देत. व्यापार, वाहतूक, उद्योग वाढीला प्रोत्साहन देत. त्यामुळे महेश्वर हे विणकरांचे अखिल भारतीय केंद्र बनले. व्यापार आणि उद्योगाचे सुप्रसिद्ध ठिकाण बनले.
प्रजाहितदक्षतेची उदाहरणे :
महेश्वरच्या रयतेकडून राघोबादादा पेशव्यांनी एकदा आठ बैल नेले. अहिल्याबाईंना हे कळताच त्यांनी त्या रयतेला प्रत्येकी आठ रुपये या प्रमाणे 64 रुपये स्वतःच्या तिजोरीतून भरपाई दिली.
कल्लू हवालदार या शिपायाची मोठी रक्कम भिकनगावी चोरी गेली होती. इतक्या छोट्या गोष्टीतही त्यांनी स्वतः लक्ष घातले आणि कल्लू हवालदाराला न्याय मिळवून दिला.
चांदवडच्या मामलेदाराने रयतेला त्रास दिल्याची अहिल्याबाईंकडे तक्रार आली. त्यांनी मामलेदाराला कडक शब्दांत ताकीद दिली. कै. सुभेदार रयतेचे उत्तम संगोपन करीत होते. रयतेला तुम्ही कोणत्याही प्रकारे त्रास देता कामा नये. त्यांची मने सांभाळून त्यांच्याकडे लक्ष देणे. फिरून जर बोभाट कानावर आला तर, परिणाम फार वाईट होतील, हे समजावे. यावरुन, वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही प्रसंगी फटकारण्याची त्यांची वृत्ती स्पष्ट व्हावी. राज्यकर्त्या म्हणून अहिल्याबाई यशस्वी होत्या. पेशव्यांच्या दरबारात त्यांना सर्वोच्च मान होता. बाईंचा सगळ्या कारभाऱ्यांवर वचक होता. प्रशासनावर घट्ट मांड होती.  
मकाजी गीते हे मराठ्यांचे मेवाडमधील वसुली अधिकारी होते. तेथील जनता त्यांना वसूल द्यायला तयार नव्हती. जनतेने लेखी मागणी केली की, दख्खन्यांमध्ये आम्ही फक्त मातोश्री अहिल्याबाईंच्या शब्दांवर विश्वास ठेवतो. त्यांच्याकडून आम्हाला पत्र आल्यास आम्ही तुमचा भरवसा धरू.
ग्रंथप्रेमी :
अहिल्याबाई स्वतः ग्रंथप्रेमी होत्या. त्यांनी त्याकाळात स्वतःचे फार मोठे दर्जेदार ग्रंथालय उभे केले होते. त्यात शेकडो ग्रंथ आणि पोथ्या जमवल्या होत्या. विशेष म्हणजे दररोज रयतेसोबत स्वतः बसून त्या जाणकारांकडून सामूहिक ग्रंथवाचन करून घेत.
अहिल्याबाई मुत्सद्दी होत्या. अष्टावधानी होत्या. त्यांनी आपले वकील भारतभर नेमले होते. त्यामुळे प्रत्येक राज्यातल्या बातम्या त्यांना तात्काळ कळत असत आणि त्यानुसार त्या आपल्या राजकारणाची दिशा ठरवत असत.
त्यांच्या दानधर्माची कीर्ती देशभर पसरली होती. त्यांनी हिमालयाच्या केदारनाथपासून दक्षिणेच्या रामेश्वरपर्यंत आणि जगन्नाथ पुरी ते द्वारकेपर्यंत मंदिरे, घाट, धर्मशाळा, अन्नछत्रे, पाणपोया उभारल्या.
बाईंनी खांद्यावर पेललेली होळकरशाही हा मराठा साम्राज्याचा मोठा आधारस्तंभ होता. सन 1780 साली त्यांचे भारतातील स्थान इतके वरचे होते की, दिल्लीचे पातशहा त्यांना वचकून असल्याचे अस्सल पत्रांवरुन दिसते.
पाश्चात्य इतिहासकार लॉरेन्स याने अहिल्याबाईंची तुलना अकबराशी केली असून, इंग्लंडची राणी एलिझाबेथ, रशियाची राणी कॅथरिन आणि डेन्मार्कची राणी मार्गारेट यांच्यापेक्षा त्या अनेक सद्गुणांनी श्रेष्ठ होत्या, असे म्हटले आहे.
अहिल्याबाई उत्तम हिंदी बोलत आणि लिहीत. एका पत्रात त्या म्हणतात, अठाका समाचार भला छे। राज का सदा भला चाहिजे। कोई तरह की दिक्कत होने पावे नहीं।
पेशव्यांनीही होळकरांच्या कारभाराची स्तुती केल्याचे आढळते. मातब्बर सरदार मोठे दाबाचे होते. शिंद्यांची तो सरदारी मोडीस आली. होळकर तिकडे होते, तेणे करून राज्यात वचक होता.हे पेशव्यांचे प्रमाणपत्र ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचे आहे.
समकालीन त्यानंतरच्या काळात देशविदेशांतील अनेक कवी, साहित्यकारांनी अहिल्याबाईंचा गुणगौरव केल्याचे दिसते.
शाहीर प्रभाकर म्हणतात,
धन्य धन्य अहिल्याबाई।
गेली कीर्ती करूनिया, भूमंडळाचे ठायी॥
महाराज अहिल्याबाई, पुण्यप्राणी।
संपूर्ण स्त्रियांमध्ये श्रेष्ठ रत्नखाणी॥
संसार चालवी दीनदुबळ्यांची आई।
जेविल्या सर्व, मगच आपण अन्न खाई॥
बांधिले घाट-मठ-पार। कुठे वनात पाणी गार॥
हिंदी कवी श्रीधर चौबे यांनी सन 1789मध्ये लिहिले होते की,
यावतचंद्रदिवाकर गंगाजल बहाई।
धनी धन्य अहिल्यामाई।
ध्रुव कैसो, अटल राज रहे।
प्रजा परिजन सुहाई॥
इंग्रज कवयित्री जोना बेली यांनी सन 1849मध्ये अहिल्याबाईंचा गौरव करताना म्हटले होते-
For Thirty years her reign of peace,
The land in blessing did increase,
And she was blessed by every tongue,
By stern and gentle, old and young,
Yea, even children children at their mother’s feet,
Are tought such homely rhyming to repeat,
Kind was her heart and tright her fame,
And Ahlya was her honoured name.”
अबराय मॅके हा प्रसिद्ध इंग्रज ग्रंथकार म्हणतो की, त्यांचे वर्णन वर्डस्वर्थच्या पुढील शब्दांत करता येईल.
A Perfect Woman, nobly planned to warm,
To comfort and command,
And yet a spirit still and bright
With something of an angel light.”
मराठीतील ख्यातनाम कवी माधव ज्युलियन यांनी पुढील शब्दांत अहिल्याबाईंचा गौरव केला आहे.
रहस्य दावी इतिहासाची कथा अहिल्याराणीची,
कांचनगंगा वाहवुनी, जी उभवी यशाचा धवलगिरी,
होळकर कुलप्रभा, कोण हो तत्स्मृतीला धरील शिरी
ज्येष्ठ कवयित्री शांता शेळके यांनी म्हटले होते की,
राजयोगिनी सती अहिल्या होळकरांची राणी,
अजुनि नर्मदा जळी, लहरती तिच्या यशाची गाणी.”
यावरुन अहिल्याबाई या थोर मुत्सद्दी, धोरणी राजकारणी, द्रष्ट्या प्रशासक, समाजहितैषि, अखिल भारतीय स्तरावर स्वतःच्या कार्यकर्तृत्वाचा लौकिक आणि दरारा प्रस्थापित करणाऱ्या महान राज्यकर्त्या होत्या, हे स्पष्ट होते. या लोकमातेचा मृत्यू 13 ऑगस्ट 1795 रोजी झाला. ‘पुण्यश्लोकअसे सार्थ बिरुद 1907 सालापासून त्यांच्या नावामागे लावले जाऊ लागले असले तरी सर्वश्रेष्ठ प्रशासक ही अहिल्याबाईंची मोहोर आज आपल्या देशाला अधिक प्रेरणादायी आहे. त्यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन.