Tuesday 4 September 2012

होळकरकालीन चांदवडचा रंगमहाल

- सुदर्शन कुलथे

नाशिकला ऐतिहासिक वारसा भरपूर लाभलाय. इतिहासातल्या कुठल्यान् कुठल्या गोष्टीशी नाशिकचे धागेदोरे जुळतात. त्यामुळेच आजही नाशिक जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यात अनेक प्राचीन लेणी , मंदिरं आणि ऐतिहासिक वास्तू दिसून येतात. असाच होळकरकालीन कलेचा एक सुंदर अविष्कार म्हणजे चांदवडचा रंगमहाल...

.............

चांदवड हे गावच मुळी ऐतिहासिक. शनिमहात्म्यात तामलिंदापूर , चैत्रमहात्म्यात चंदवड , जैन साहित्यात चंददिव्यपूरी तर यादवांच्या काळातलं चांदोर अशी निरनिराळ्या काळातली आताच्या चांदवडची नावं सापडतात. गिर्यारोहक मंडळींचा चांदवडच्या प्रदेशात नेहमीच चक्कर असतो. कारण , या भागाच्या सातमाळा पर्वतराजीतले तालेवार गड-किल्ले नेहमीच त्यांना खुणावत असतात. घाटात असणाऱ्या रेणुकादेवीच्या दर्शनालाही बऱ्याचदा जाणं होतं. पण चांदवडला आत गावात जाऊन तिथल्या ऐतिहासिक वास्तू पाहण्याचं राहूनच गेलेलं असतं. चांदवडला कसं जायचं हे काही वेगळं सांगायला नको. काळाच्या ओघात काही जुने वाडे , वेशी आणि तटबंदी पडून गाव विस्तारलेलं असलं तरीही आज दोन-तीन वेशी आपल्याला बघायला मिळतात. चांदवड गाव पूवीर् सात वेशींमध्ये बांधलेलं होतं. दिल्ली दरवाजा , धोडंबे (धोडप) दरवाजा , बाजार वेस , जुनी सरकारी वेस , आनकाई वेस , ढोलकीची वेस (शिवाजी चौकातली) , गुजरात गल्ली वेस अशा वेशींपैकी काही आज पाहावयास मिळतात तर काहींना वाढत्या गावाने फोडून टाकलं आहे. एसटी स्टॅण्ड कडून गावात जातांना आठवडे बाजार वेस आपलं स्वागत करते. या वेशीवर जरी हल्ली फ्लेक्स बोर्ड झळकत असले तरी मुख्य दरवाज्याच्या दोन्ही बाजूंना पूवीर्चे शिलालेख आढळतात. एक मराठीतला तर दूसरा फारसी भाषेत कोरलेला आहे. मराठीतला शिलालेख थोडं बारकाईने बघितला तर वाचता येतो. इथूनच चांदवड आपल्याला त्याच्या प्राचीनत्त्वाची प्रचिती देतं. गावात काही प्रसिद्घ आणि शिल्पकलेचे अद्वितीय नमुने असलेले साखळीवाडा , तटेर्वाडा , गोखलेवाडा , वैद्यवाडा असे जुने वाडेही होते , असं म्हणावं लागतं. कारण तेही पोखरून नेस्तनाबूत झालेत.
या सर्वात आजही आपलं अनोखं सौंदर्य घेऊन उभा आहे तो म्हणजे रंगमहाल. गावातल्या बच्चालाही विचारलं रंगमहाल कुणीकडे , तरीही लगेच तो बोट करून रस्ता दाखवतो. आजुबाजूला दोन भव्य बुरुज , तटबंदी आणि मध्यभागी उंच असं दगडी प्रवेशद्वार. रंगमहाल इतका मोठा अगदी जवळजवळ पुण्याच्या शनिवार वाड्याएवढा असेल याची आपल्याला कल्पनाही नसते. उत्तरेकडे तोंड असलेल्या प्रवेशद्वाराची कोरीव कमान , छोट्या खिडक्या , आत पहारेदाराच्या खोल्या आणि वर अंबारीसारखे घुमट असलेली तटबंदी असा रंगमहालाचा रुबाबदार थाट दिसतो. प्रवेशद्वाराचा लाकडी दरवाजा आजही शाबूत असून तोही वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने घडविलेला दिसतो. परकीय आक्रमण झाल्यास दरवाजा हत्तीच्या धडकेने तोडला जाऊ नये म्हणून त्यावर लांब व टोकदार असे लोखंडी खिळे बसविलेले दिसतात. दरवाजाच्या भव्यतेवरून आतल्या रंगमहालाचा पसारा किती असावा याचा अंदाज येतो. आत प्रवेशताच समोर मुख्य महाल नजरेत पडतो. इथं बऱ्यापैकी लोकांची वर्दळ दिसून येते. ही वर्दळ रंगमहाल बघण्यासाठी नाही तर ह्यात चालणाऱ्या पोस्ट ऑफिस , ग्रामीण कार्यालयं व कोर्टकचेरीच्या कामांसाठी आलेल्यांची असते. रंगमहालासारख्या वास्तूचा वापर सरकारच्या सार्वजनिक कामासाठी होतोय हे बघून कलेचा पुरातन वारसा जतन व्हावा अशी प्रामाणिक इच्छा असणाऱ्या कलाकाराला निश्चितच दु:ख होतं. पण तरीही आज इतक्या सुस्थितीत असलेला महाल बघून आनंदही होतो.

मुख्य इमारतीत आत गेल्यावर लाकडाचे भव्य खांब त्यावरील नक्षीकाम , गोलाकार कमानी , बारीक कलाकुसरीची वेलबुट्टी , लाकडाला कोरून केलेल्या जाळीच्या भिंती असं किती बघावं नि किती नाही असं होतं. आत गेल्यावर आपण महालातच्या मध्यभागी असलेल्या मोकळ्या चौकात येऊन पोहोचतो. हा जवळपास ६० बाय ६५ फूट एवढा चौक असून त्याच्या अवतीभोवती नजर फिरविल्यास लाकडावर किती बारीक आणि देखणं नक्षीकाम होऊ शकतं याचा प्रत्यय येतो. खुल्या चौकाच्या चारही बाजूंना वेगवेगळी दालनं , त्या दालनांचे लाकडी खांब आणि त्या खांबांच्या वरच्या भागावर काष्ठशिल्प , आडव्या तुळईंवरच्या बारीक वेलबुट्टी आणि असे कोरीव लाकडी खांबांचे एकावर एक तीन मजले असा हा भव्यदिव्य सेटच उभारलेला आहे. या काष्ठशिल्पात आपल्याला अनेक वेगवेगळी फुलं , पोपट , मोर इ. पक्षी तसंच हत्ती , सिंह , वानर अशा अनेक प्राण्यांच्या कलात्मक प्रतिमा कोरलेल्या दिसतात. रंगमहालाच्या भिंतीही जुन्या विटांच्या आणि दगडी बनावटीच्या भक्कम अशा बनविलेल्या आहेत. संपूर्ण बांधकाम चुन्यात केलेलं आहे. या मध्यभागाच्या चौकात आपण या सर्व कलात्मकतेत हरवूनच जातो. इथं दर्शनी भागातल्या एका दालनात होळकरांची राजगादी ठेवलेली असून होळकर वंशीयांचे जुने फोटोही लावलेले आहेत. हल्लीच इथं अहिल्यादेवींची छोटी मूतीर् बसवून त्यासमोर कारंजा बसवून थोडं सुशोभिकरणही केलेलं आहे. रंगमहालाच्या वरच्या भागात जाण्यासाठी जिने आहेत. इथं वर कोर्टाचं कामकाज चालतं. सगळी दालनं कागदंपत्रांनी भरलेली असून वकील , लिपिक , एजंट आणि लोकांची बरीचशी गदीर् या कलात्मक महालात निरस चेहेऱ्याने वावरत असलेली दिसते.
या वरच्या भागाच्या छतावर फारच सुंदर असं रंगकाम केलेलं आहे. लाकडी फळ्यांवरची त्या काळातली पेंटींग्जही अतिशय देखणी आहेत. काही दालनांमध्ये फिरलं तर इथं बरीचशी भित्तीचित्रंही दिसतात. त्यात निसर्ग , प्राणी , पशुपक्षी , यांच्यासोबतच तात्कालिन महिला , पुरुष , त्यांची वेशभूषा इत्यादी बाबी चित्रांकीत केलेल्या दिसतात. आजही इथली चित्रं सुस्थितीत आहेत. यावरून आपल्याला त्या रंगांच्या टिकाऊपणाची कल्पना येते. अजिंठ्याची भित्तीचित्रं जशी जगभरात प्रसिद्घ आहे त्याच प्रकारच्या टेम्प्रा टेक्निकने इथली चित्रं चितारलेली आहेत. होळकरांच्या इंदोरलाही अशी चित्रं बघायला मिळतात. पण त्यापेक्षाही चांदवडची ही चित्र जुनी आहेत. सन १९२१ मध्ये सुप्रसिद्घ पुरातत्त्व तज्ज्ञ आर. आर. बॅनजीर् यांनी चांदवडच्या रंगमहालातली ही चित्रं अवलोकन केली. त्यानंतर १९३३ मध्ये नाशिक जिल्ह्याचे तात्कालिन न्यायाधिश एच. एफ. नाईट यांनी ही चित्र पाहून जे. जे. स्कुल ऑफ आर्टचे त्यावेळचे संचालक एच. जे. किंग यांना त्याच्या अभ्यासासाठी आमंत्रित केलं. तेव्हा किंग यांनी ही भित्तीचित्रं बघून आश्चर्य प्रकट केलं आणि या चित्रांचा अहवाल तयार करून होळकरांना पाठविला. होळकरांनी तिथल्या कलागुरु देवळालीकर यांना या चित्रांच्या वगीर्कृत अभ्यासासाठी पाठवलं आणि त्यानंतर १० वर्षांनी म्हणजे १९४४ मध्ये ही भित्तीचित्रं संरक्षित झाली. अशा ह्या चित्रांमधल्या रामायण , महाभारतासोबतच अनेक पौराणिक आख्यानं आणि कृष्णलीला बघण्यात आपण हरवून जातो. नाशिक जिल्ह्यात इतकी चांगली प्राचीन चित्रं बघायला मिळतात याचा अभिमानही वाटतो. रंगमहाल हा शब्द ऐकला म्हणजे राजामहाराजांचं हे अय्याशीचं ठिकाण असावं असं वाटतं. कारण जिथं नतिर्का नाचतात वगैरे गोष्टी म्हणजे रंगमहाल असं वाटतं. पण इथं आल्यावर कळतं की इथल्या या अनोखी चित्रकला असलेल्या रंगकामामुळे रंगमहाल नाव पडलेलं आहे.

रंगमहालाच्या सर्वात वरच्या भागावर तटबंदी असून दोन अंबारीसारख्या उंच अशा खोल्या बनविलेल्या दिसतात. देखरेखी बरोबरच नगारा किंवा तुतारी वाजविण्यासाठीचे हे उंच मिनारासारखं दालन असावं. सर्वात खाली तळघर असून यातून एक भुयारी मार्ग थेट रेणुका देवीच्या मंदिरात गेलेला आहे. पण सध्या हा बंद करून ठेवलाय. अजून एक दिव्य वास्तू प्रकार रंगमहालात बघायला मिळतो. तो म्हणे इथं असलेली भली मोठी विहीर. ही एक प्रचंड मोठी पायऱ्यांची बारव असून त्यात चारही बाजूने खाली पाण्यापर्यंत उतरण्यासाठी पायऱ्या केलेल्या आहेत. ही विहीर इतकी मोठी आहे की आत एकाच वेळी पाचपन्नास लोक उतरू शकतात. उतरणाऱ्या जिन्याला अनेक कमानींचे दरवाजेही आहेत. तसेच कपडे बदलण्याची किंवा इतर वापरासाठी विविध खोल्याही त्यात केलेल्या आहेत. एवढी भव्य विहीर नाशिक जिल्ह्यात क्वचितच कुठे बघावयास मिळेल! यात बाराही महिने पाणी तुडूंब भरलेलं असतं.

असा हा रंगमहाल कितीही बघितला तरी दरवेळी नवनव्या गोष्टी दाखवतच जातो. चित्रकार , वास्तुकार , इतिहासतज्ज्ञ , शिल्पकार , संशोधक असं कुणीही आलं तरीही रंगमहाल त्यांना काही ना काही अद्भुत देतोच. कितीही वेळ बघितला तरी वाटतंच राहतं , ' नका सोडून जाऊ रंगमहाल.... '