Thursday, 20 February 2014

सुभेदार मल्हारराव होळकरमराठी, विशेषतः पेशवेकालीन इतिहास वाचकांना मल्हारराव होळकर हे नाव परिचयाचे आहे. मल्हाररावविषयी फारसे काही माहिती नसले तरी नजीबखानाचा आश्रयदाता व पानिपतच्या लढाईतून पळून जाणार सेनानी हि मल्हाररावाची आपल्या थोर इतिहासकारांनी बनवलेली इमेज सुपरिचित अशीच आहे.
मल्हाररावावरील आक्षेपांचे खंडन करणे वा त्याची मलीन ( ? ) असलेली प्रतिमा अधिकाधिक काळीकुट्ट करून रंगविणे हा या लेखाचा हेतू नाही. मल्हाररावाच्या आयुष्याचा / कारकीर्दीचा एक धावता आढावा घेत तत्कालीन राजकारणात व इतिहासात त्याचे नेमके स्थान काय आहे याचा शोध घेणे हाच या लेखाचा हेतू आहे.
मल्हाररावाचा जन्म झाला ( स. १६९३ ) तेव्हा शिवछत्रपतींनी स्थापलेले स्वराज्य जवळपास संपुष्टात आलेले होते. उभ्या महाराष्ट्रात मोगल व मराठी फौजांचा एकप्रकारे नंगानाच चालू होता. अशा काळात शांततामय जीवन हि एक कविकल्पना बनली होती आणि बळी तो कानपिळी अशी स्थिती असलेल्या सामाजिक वातावारणात जगण्यासाठी शस्त्रधारी बनणे भाग होते. मल्हारराव त्या काळाचे अपत्य होते. ज्या काळात छत्रपती परागंदा होऊन जिंजीच्या प्रदेशात राहिले होते. एकाच वेळी स्वराज्य व मोगलाई या दोन्ही दरडींवर हात ठेवून आपली वतने सुरक्षित राखण्याचा प्रयत्न केला जात होता. स्वराज्य वा मोगलांसाठी लढणे म्हणजे लुटीला जाणे व अडचणीचा प्रसंग दिसतांच धूम ठोकणे हि एक युद्धकला समजली जात होती. ना राष्ट्र होते ना राष्ट्रनिष्ठा होती ! धनाजी जाधव, परसोजी भोसले, दाभाडे, आंग्रे, थोरात, बाळाजी विश्वनाथ इ. पुढील काळात प्रसिद्धीस आलेली लोकं याच काळाचे नायक होते. यांच्या धरसोडीच्या निष्ठांची जी पुढील काळात खंडीभर उदाहरणे सापडतात त्याची बीजे याच काळांत दडलेली आहेत. अशा या कालखंडात जन्मलेल्या व वाढलेल्या मल्हाररावची प्रवृत्ती पायापुरते पाहणे अशी बनल्यास त्यात आश्चर्य ते काय !
मल्हारराव आपल्या मामाच्या भोजराज बारगळच्या आश्रयाने लहानाचा मोठा झाला. पुढे कालमानानुसार सैन्यात दाखल होणे व हाताखाली काही स्वार शिपाई बाळगून शिलेदार / पथक्या बनणे या अवस्थांमधून मल्हारराव गेला. मल्हाररावाचा मामा भोजराज हा कदम बांड्याच्या हाताखाली होता. आरंभी जरी मल्हारराव मामाच्या सोबत असला तरी शिलेदार / पथक्या बनताच त्या काळात प्रचलित असलेल्या पद्धतीनुसार स्वतंत्र कर्तुत्व गाजवू लागला. आता त्या काळात स्वतंत्र कर्तुत्व गाजवणे म्हणजे लुटीची आशा असेल त्या मोहिमेत सहभागी होणे होय !
मल्हारराव अशा प्रकारे स्वतंत्र कर्तुत्व गाजवत असतानाच छ. शाहू आपले बस्तान बसवण्यासाठी धडपडत होता. बाळाजी विश्वनाथाने मुत्सद्देगिरीने शाहूला बादशाही सत्तेचा मांडलिक, संरक्षक व छ. शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा वारस ज्या प्रसिद्ध दिल्ली स्वारीत बनवले ( स. १७१८ १९ ) त्या दिल्ली मोहिमेत मल्हारराव देखील सहभागी झाला होता. बाळाजी विश्वनाथाच्या दिल्ली स्वारीचा काळ हा काहीसा महत्त्वाचा आहे. आजवर मोगल मराठे ( मराठा हा शब्द जातीय अर्थाने वापरला नाही याची कृपया नोंद घ्यावी. ) परस्परांचे शत्रू होते. मोगलांपासून आपले राज्य राखण्यासाठी मराठे झगडत होते पण या स्वारीमुळे मराठे मोगल मित्र बनून एकमेकांचे संरक्षक ( निदान कागदावर तरी ) बनले. याचा परिणाम म्हणजे महाराष्ट्रभर फिरणाऱ्या, पूर्णवेळ एकांड्या शिलेदार / पथक्यांना व स्वतंत्र वृत्तीच्या सरदारांना एक नवीन कार्यक्षेत्र उपलब्ध झाले. अर्थात याचा अस्पष्ट असा आरंभ छ. राजारामच्या काळात मन मानेल तशी वतने मंजूर करण्याच्या कृतीने व्यक्त झालाच होता. शाहूने व बाळाजीने त्यास व्यापक असे स्वरूप दिले इतकेचं ! बाळाजीच्या दिल्ली मोहिमेने शाहूचे आसन काहीसे बळकट झाले असले तरी मल्हारराव मात्र अजूनही कोठे स्थिर झाला नव्हता. मात्र त्याच्या व्यवहारी बुद्धीने अनुकूल अशा कार्यक्षेत्राची निवड केलेली होती.
छ. राजारामाच्या काळातचं मराठी सरदार नर्मदेपार माळव्यावर धाड घालू लागले होते. याबाबतीत नेमाजी शिंद्याचे कार्य प्रसिद्ध आहे. बाळाजी विश्वनाथाने दिल्लीला जाऊन ज्या स्वराज्याच्या सनदा आणल्या त्या स्वराज्याचा पुढील उद्योग स्पष्ट होता व तो म्हणजे आपले घर बळकट करून माळव्यात घुसणे. दुर्दैवाने बाळाजी विश्वनाथास पुढील उपक्रम सिद्धीस नेण्यासाठी फारसे आयुष्य लाभले नाही. स. १७२० मध्ये त्याचा मृत्यू झाला व त्याच्या पश्चात बाजीरावास शाहूने पेशवाई दिली. बाजीरावास पेशवेपद मिळाले खरे पण बाजीरावाची तलवार अजून तळपली नसल्याने स्वराज्याचा आपले घर बळकट करून माळवा गाठण्याचा उद्योग काहीसा लांबणीवर पडला. मल्हाररावास तत्कालीन राजकारणाची कितपत जाण होती हे माहिती नाही पण नर्मदेच्या आसपासच्या प्रदेशात त्याने आपल्या कारवाया सुरु केल्या. अंगच्या पराक्रमामुळे त्या भागातील तो एक नामांकित लढवय्या व मुत्सद्दी बनला पण त्याची ख्याती अजूनही लोकल एरिया पुरतीच मर्यादित होती. परंतु असे असले तरी माळव्यावर स्वारी करणाऱ्या आक्र्मकास किंवा दक्षिणेत उतरणाऱ्या आक्रमकाला मल्हाररावस डावलणे आता शक्य नव्हते. म्हणजे पुंड / स्वतंत्र वृत्तीने राहणारा मल्हारराव हा तितकासा दुर्लक्षणीय एकांडा शिलेदार राहिलेला नव्हता.
मल्हाररावाचे महत्त्व व त्याची उपद्रवक्षमता लवकरचं बाजीरावाच्या अनुभवास आली. बढावणीचा प्रसंग उद्भवून व मल्हाररावास अनुकूल केल्याखेरीज माळव्यात शिरणे शक्य तितकेसे सोपे नसल्याचे बाजीरावाच्या प्रत्ययास आले. बापाचा धोरणीपणा त्याच्या अंगी होताचं. त्यास अनुसरून त्याने मल्हाररावास आपल्या बाजूला वळवून घेतले. या ठिकाणी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेणे गरजेचे आहे व ती म्हणजे मल्हारराव हा बाजीरावास फक्त अनुकूल झाला होता, त्याचा अंकित बनला नव्हता. वाचकांना माझे हे विधान धक्कादायक वाटेल पण ते वस्तुस्थितीवर आधारित आहे. या ठिकाणी फक्त इतकेच नमूद करतो कि, ज्या पद्धतीने बाळाजी विश्वनाथाने कान्होजी आंग्रे प्रभूती सरदारांना शाहूच्या बाजूस वळवून घेतले जवळपास त्याच पद्धतीने बाजीरावाने मल्हाररावास आपल्या पक्षात वळवून घेतले. त्यामुळे मल्हाररावाने बाजीराव किंवा इतर पेशव्यांशी निष्ठा राखण्याचा जो प्रश्न आपले इतिहासकार / वाचक उपस्थित करतात तोच मुळी चुकीचा असल्याचे दिसून येते. माझे हे विधान मी एका उदाहरणाच्या आधारे सिद्ध करू शकतो. बाजीरावाच्या प्रसिद्ध माळवा, दिल्ली स्वाऱ्या सुरु झाल्या. राजपुतांशी, विशेषतः सवाई जयसिंगासोबत बाजीराव व शाहूचा स्नेह विशेष वाढीस लागला. अशा या सवाई जयसिंगाच्या विरोधात शाहूच्या आज्ञेने शस्त्र उपसण्याचे कार्य मल्हाररावाने केले. होळकर जर बाजीरावाचा अंकित असता तर त्यास अशी थेट आज्ञा करण्याची शाहूला गरज काय ? बाजीरावास देखील हा प्रकार फारसा खटकल्याचे दिसून येत नाही. एक मात्र आहे कि, जेव्हा सवाई जयसिंगाच्या भेटीस तो गेला तेव्हा मुद्दामहून त्याने सोबतील मल्हाररावस घेण्याचे टाळले.
बाजीरावाच्या हयातीतचं मल्हाररावाने इंदूर येथे आपले संस्थान थाटले होते. लौकिकात पेशवे हुकुम देतील तेव्हा स्वारीत सहभागी होणे होळकरास बंधनकारक असले तरी स्वतंत्रपणे मोहिमा आखण्याचे त्याचे स्वातंत्र्यही अबाधित होते. नानासाहेब पेशव्याच्या कारकिर्दीतील मल्हाररावाचा वर्तनक्रम माझ्या या विधानाची सत्यता पटवण्यास पुरेसा आहे. वस्तुतः मल्हाररावाच्या स्वतंत्र वर्तनास आळा घालण्यासाठी पेशव्यांनी त्याच्या पदरी कारभारी नेमून दिला होता. पण या कारभाऱ्यालाच मल्हाररावाने बगलेत मारल्याने पेशवे काहीसे हतबल झाले.
नजीबखानाच्या प्रकरणांत मुख्यतः मल्हारराव बदनाम झाला आहे. परंतु, नजीबसोबत त्याचे जे काही संबंध होते ते एक स्वतंत्र संस्थानिक या नात्याने होते. या बाबतीत मल्हाररावास दोष देणे योग्य नाही.
शाहू मृत्यूपंथास टेकल्यावर नानासाहेब पेशव्याचे उत्तरेकडील राजकारणावर दुर्लक्ष झाले. यावेळी मल्हाररावावर पेशव्यांचे उत्तरेत वर्चस्व राखणे व सोबतीला आपले स्वतंत्र अस्तित्व रक्षिणे या दोन जबाबदाऱ्या होत्या व या जबाबदाऱ्या त्याने मोठ्या कौशल्याने पार पाडल्या. स. १७४९ ५० नंतर नानासाहेबाचे उत्तरेकडील राजकारणावर बरेचसे दुर्लक्ष झाले व छत्रपती आणि राजमंडळावर दाब बसवण्यावर जास्त भर दिला.
मराठी राज्याचे उत्तरेकडील राजकारण बिघडण्यास होळकरापेक्षा स्वतः नानासाहेब पेशवा अधिक जबाबदार होता. होळकराचे स्वतंत्र वर्तन त्याच्या परिचयाचे होते. अशा परिस्थितीत एकतर स्वतः पेशव्याने उत्तरेत जाणे किंवा आपल्या भावांना अथवा मुलांना उत्तरेच्या राजकारणात गुंतवणे असे तीन पर्याय नानासाहेबासमोर होते. यापैकी पहिला पर्याय त्याने स. १७४० ५० च्या दरम्यान योजून पाहिला. त्यात काहीसे यश त्याला मिळाले पण शाहूचा अंतकाळ उद्भवल्याने त्याचे उत्तरेकडील लक्ष उडाले. आपल्या भावांना त्याने उत्तरेच्या राजकारणात गुंतवण्याचा प्रयत्न केला पण त्यांना वर्तन स्वातंत्र्य मात्र त्याने फारसे दिले नाही. पुढे पानिपत मोहिमेच्या निमित्ताने नानासाहेब पेशव्याने आपल्या मोठ्या मुलाला, विश्वासरावाला उत्तर हिंदुस्थानात पाठविले पण पानिपतचे प्रकरण त्याच्या मुळाशी आले ! पानिपत नंतर उत्तर हिंदुस्थानची सर्व जबाबदारी पेशव्याने होळकराच्या गळ्यात बांधली. मात्र त्यावर अंकुश राखण्यासाठी दक्षिणेतील त्याचे महाल जप्त करण्याचे कार्य केले. नंतर मागाहून त्याने ते मोकळे देखील केले.
पानिपतचा विषय निघालाचं आहे तर मल्हाररावाने जी फितुरी केली त्याबद्दलही थोडी चर्चा करणे गरजेचे आहे. रघुनाथरावाच्या अटकस्वारीत मल्हाररावाने नजीबचा बचाव केला हे खरे पण त्यानंतर ४ वर्षांनी पानिपत घडणार असल्याचे त्याला काय स्वप्न पडले होते ? दुसरी गोष्ट अशी, पानिपतच्या युद्धाचा उत्पादक म्हणून नजीबची ख्याती असली तरी, जर नजीबने हे कार्य केले नसते तर ते कार्य पार पाडण्यास इतर कोणी पुढे सरसावलेच नसते असे कोणी खात्रीपूर्वक सांगू शकेल का ? मोगल बादशाह, बादशाही जनानखान्यातील स्त्रिया, राजपूत राजे अब्दालीला हिंदुस्थान स्वारीचे निमंत्रण देण्यास नेहमीच उत्सुक असत हे या ठिकाणी विसरून चालणार नाही. राहता राहिला मुद्दा लढाईतून माघार घेण्याचा तर पहिली गोष्ट अशी कि, लढाईतून निघून जाणारा मल्हारराव हा काही पहिला सरदार नव्हता. विंचूरकर, गायकवाड प्रभूती गोलाच्या पूर्वेकडील सरदारांनी लढाईतून माघार घेतल्यावर व लढाई बिघडल्यावर तिथे थांबण्यात काही अर्थ नाही हे लक्षात घेऊन मल्हाररावाने रणभूमी सोडली. त्याच्या या कृत्याबद्दल नानासाहेब पेशवा अथवा प्रत्यक्षदर्शी नाना फडणीस देखील त्यास दोष देत नाही. आता या दोन नानांपेक्षा स्वतःला जे जास्त शहाणे समजत असतील त्यांच्याशी काय वाद करायचा ?
पानिपत नंतर सुमारे दहा महिन्यांनी झालेल्या एका भीषण संग्रामात शिंद्यांच्या मदतीने मल्हाररावाने माधोसिंग व इतर राजपूत संस्थानिकांचा मोठा पराभव केला.  पानिपत नंतर पेशवे घराण्यात भाऊबंदकी माजली. त्यावेळी मल्हाररावाने त्यात सक्रीय असा सहभाग फारसा घेतल्याचे दिसून येत नाही. निजाम पेशवे कलहात पटवर्धन भोसले सारखे सरदार निजामला मिळाले असतानाही मल्हाररावाने पेशव्यांचाच पक्ष स्वीकारला. पानिपत प्रकरणानंतर पेशव्यांच्या प्रमाणेच शिंद्यांच्याही घराण्यात वारसाहक्काविषयी तंटे निर्माण झाले. शिंद्यांची सरदारकी बुडवण्याची हि एक उत्कृष्ट अशी संधी मल्हाररावासमोर चालून आली होती. परंतु त्याने हा मोह कटाक्षाने टाळला. याबाबतीत इतिहासकारांनी व अभ्यासकांनी मल्हाररावाचा गौरव करायला हवा.
स. १७६१ नंतर दिल्लीच्या राजकारणात इंग्रजांचा हस्तक्षेप होण्यास आरंभ झाला होता. बंगालचा घास गिळून त्यांनी सुजाला गुंडाळण्यास आरंभ केला. सुजाने मल्हाररावाचे पाय धरले. सुजाच्या मदतीला जाऊन इंग्रजांशी झुंज घेण्यात मराठी राज्याचे फारसे हित नव्हते. तसेच त्यावेळी दिल्लीचे राजकारण खेळण्याची ताकद मराठी राज्यात उरली नव्हती. परंतु, मल्हाररावाने सुजाचे राजकारण स्वीकारले. अर्थात, हि एक प्रकारे त्याची स्वतंत्र मोहीम होती. कुरा व काल्पी येथे त्याने इंग्रजांचा पराभव करून मल्हाररावाने आपला लौकिक कायम राखला. ( स. १७६५ ) काल्पीच्या या होळकरी विजयास काही मराठी इतिहासकार पराभवाचे लेबल लावतात. स्वाभाविक आहे, कारण होळकराच्या स्वतंत्र राजकारणाचा तो विजय होता तेव्हा त्याचे कौतुक कोण करणार ?
इंग्रजांची मोहीम आटोपल्यावर मल्हारराव फार काळ जगला नाही. २१ मे १७६६ रोजी त्याचे निधन झाले. सामान्यतः आपल्या अर्धशतकाच्या राजकीय कारकिर्दीत मल्हाररावाने आपले स्वतंत्र संस्थान तर निर्माण केलेच पण सोबतीला उत्तर हिंदुस्थानात मराठी साम्राज्य उभारण्यात मोलाचा वाटा उचलला. या लेखाच्या आरंभी म्हटल्याप्रमाणे स्वतःच्या पायापुरते पाहण्याच्या काळात मल्हारराव लहानाचा मोठा झाल्यामुळे त्याचे पहिले प्राधान्य नेहमी स्वतःच्या हितसंबंधांना व मागाहून पेशव्यांच्या हितसंबंधाना राहिले. अर्थात, त्याचे राजकीय चातुर्य असे कि, त्याने जवळपास बऱ्याच कामांत आपले व राज्याचे हित देखील एकदम साधून घेतले.
सारांश, तत्कालीन इतिहासात जे स्थान कान्होजी आंग्रे, बाळाजी विश्वनाथ, परसोजी भोसले इ. सरदारांना आहे तेच स्थान मल्हारराव होळकराचे असल्याचे दिसून येते.

संदर्भ ग्रंथ :-
(१)    सुभेदार थोरले मल्हारराव होळकर यांचे चरित्र :- श्री. मुरलीधर मल्हार अत्रे
(२)    मराठी रियासत :- श्री. गो. स. सरदेसाई
(३)    पानिपत १७६१ :-  श्री. त्र्यं. शं. शेजवलकर
(४)    पानिपत असे घडले :- संजय क्षीरसागर
---- संजय क्षीरसागर

Tuesday, 28 January 2014

महाराणी शर्मिष्ठादेवी होळकर


महाराणी शर्मिष्ठादेवी होळकर यांचे मूळ नाव नॅन्सी अॅन मिलर होते व महाराजा तुकोजीराव होळकर (तिसरे) यांच्या त्या पत्नी होत्या. त्यांचा जन्म अमेरिकेत ९ सप्टे १९०७ साली झाला होता. त्यांच्या आईचे नाव जेनी मिलर व वडिलांचे नाव जॉन मिलर होते जे कि अनेक सोन्याच्या खाणीचे मालक असणारे अमेरिकेतील प्रसिद्ध उद्योगपती होते. नॅन्सी अॅन मिलर हे नाव जरी भारतात जास्त प्रसिद्ध नसले तरी अमिरिकेत आजही भारतीय महाराजाशी विवाह करणारी पहिली अमेरिकन तरुणी म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांचा मृत्य १९९५ साली सुख निवास राजवाडा, इंदोर येथे झाला.
 महाराजा तुकोजीराव युरोपच्या दौर्‍यावर असताना त्यांची आणि नॅन्सी अ‍ॅनी मिलर यांची भेट झाली. पुढे या भेटीचे रुपांतर प्रेमात झाले. त्यानंतर तुकोजीराव यांनी विवाहाचा प्रस्ताव ठेवला. महाराज अ‍ॅनीच्या प्रेमात इतके बुडून गेले होते की वेळ पडल्यास धर्म बदलायची तयारी पण त्यांनी केली होती. त्यावेळेस तुकोजीराव यांनी नॅन्सी यांना भेट दिलेली हिऱ्याची जोडी ही जगातील सर्वात सुंदर हिऱ्यापैकी एक होती. ती इंदूर पिअर्स या नावाने देखील प्रसिद्ध आहे.
 महाराजा तुकोजीराव होळकर हे आपल्या भावी पत्नीसह भारतात परतल्यानंतर मात्र त्यांच्या विवाहास वधू ही एका ख्रिश्चन असल्यामुळे कट्टर हिंद्त्ववादी असणाऱ्या अनेक जातीय संघटनांनी त्यास कडाडून विरोध केला. त्यामुळे हा विवाह होण्याआगोदरच मोडतो कि काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. हिंदुत्ववादी संघटनेचा विरोध पाहता काही मुस्लीम धर्मप्रचारक हे तुकोजीरावांच्या संपर्कात होते. हिंदुस्तानातील सर्वात श्रीमंत असणारे हिंदू राजे मुस्लीम धर्म स्वीकारणार ह्या बातमीने हिंदुत्ववादी संघटनानी जरा आवरत घेतले आणि नॅन्सी अॅन मिलर यांनी जर हिंदू धर्म स्वीकारला तर विवाहाला आमचा विरोध राहणार नाही.
 ह्या आंतरवांशिक विवाहाने जगभरातील प्रसारमाध्यमांचे लक्ष्य वेधले, आणि जगभर सर्वत्र ह्या अनोख्या विवाहाची चर्चा रंगू लागली. महाराष्ट्रातील सत्यशोधक चळवळीतील प्रबोधनकार ठाकरे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ह्या विवाहाचे समर्थन केले. यावेळी तुकोजीराव यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मदत मागितली. त्यानंतर बाबासाहेबांनी बारामतीस धनगर समाजाची परिषद ७-६-१९२८ रोजी भरविली. त्या लग्नास समंतीवजा ठराव पास केला.
 पुढे ता. १३-३-१९२८ रोजी नाशिक येथे डॉ. कुर्तकोटी शंकराचार्य यांनी मिस मिल्लर यांना हिंदू धर्माची दीक्षा दिली. व लम्भाते कुटुंबियांनी तिला दत्तक घेऊन त्यांना धनगर करुन घेतले व त्या नॅन्सी अॅन मिलर च्या शर्मिष्ठादेवी होळकर बनल्या. ता १७-०३-१९२८ रोजी वडवाई येथे लग्न झाले. त्या लग्नाकरता महाराष्ट्रातून स्पृश्य-अस्पृश्य मिळून पाचशेवर लोक नेले होते.  
 तुकोजीराव होळकर व शर्मिष्ठादेवी होळकर यांना एकुण चार मुली झाल्या. तुकोजीराव यांनी होळकर घराण्यातील आंतरजातीय विवाहाची परंपरा पुढे चालू ठेऊन त्यांच्या पहिल्या पत्नी पासून झालेल्या झालेल्या मुलाचा कुणबी समाजातील मुलीशी लावून दिला तसेच त्याच घरात आपल्या शर्मिष्ठादेवी यांच्या पासून झालेल्या मुलीचा विवाह लावून दिला.  दुसऱ्या मुलीचा विवाह हा त्यांनी पतियाला येथील शीख राजपुत्राशी आंतरधर्मीय लावून दिला.
 आता नॅन्सी अ‍ॅनी मिलर ह्या महाराणी शर्मिष्ठादेवी होळकर बनल्या म्हंटल्या नंतर आमच्या जातीयवादी बंधू आणि भगिनींना जरा त्याची बदनामी करायची जुनी सवयच आहे. काय कारण आहे कुणास ठाऊक ह्या आमच्या बांधवाना होळकर हे नुसत नाव जरी ऐकले कि कपाळावर आठ्या निर्माण होतात. मग नेहमी प्रमाणे त्यांच्याबद्दल ही आरोप करायला, अफवा उठवायला ही मोकळी होतात ही मंडळी... ह्यांच्या अफवा काय तर म्हणे तुकोजीराव व शर्मिष्ठादेवी यांचा विवाह फार काळ टिकला नाही. आणि लवकरच घटस्फोट झाला व वापस विदेशी निघून गेल्या...आता काय बोलावे ह्या जातीयवादी बंधू आणि भगिनीबद्दल...मुळात असेही काहीही झाले नव्हते तुकोजीराव व शर्मिष्ठादेवी यांचा विवाह शेवटपर्यंत टिकला आणि जन्माने विदेशी असूनही शर्मिष्ठादेवी यांनी भारतीय संस्कृतीशी एकरूप झाल्या होत्या...शार्मिष्ठादेवी यांनादेखील तुकोजीराव यांचाशी होणाऱ्या आंतरवांशिक विवाहाच्यावेळी अमेरिकेतील लोकांचा विरोध पत्कारला, तसेच ख्रिश्चन धर्मियांचा देखील त्यांना विरोध झाला होता. तो विरोध न जुमानता त्यांनी तुकोजीराव होळकर यांच्याशी विवाह केला ही त्या काळातील एक क्रांतिकारक घटना होती... 
-          सचिन शेंडगे (९८६०३२४३८४) 

Thursday, 23 January 2014

होळकर घराण्यावरील Online उपलब्ध असणारी EBooks...


होळकर घराण्यावरील Online उपलब्ध असणारी EBooks...
 
Life and Life's work of Devi Shree Ahilya Bai Holkar (1725-1795 A.D.)
: Vasudev V. Thakur
https://docs.google.com/file/d/0B7X-MK0LKr0gOGg3S3R2V1A3eWc/edit

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे चरित्र : पुरुषोत्तम

अहिल्याबाई होळकर : हरिलाल शर्मा (पंजाबी)(१९७१) : ਅਹਿਲ੍ਯਾ ਬਾਈ : ਹਰੀ ਲਾਲ
ਸ਼ਰਮਾ (ਪਂਜਾਬੀ) (੧੯੭੧)
https://docs.google.com/file/d/0B7X-MK0LKr0gZVFXZjQzSHVwSVE/edit

અહિલ્યા બાઈ હોલકર નું ચરિત્ર : પરમાનંદ ભોળાભાઈ મુનશી (૧૮૮૪) (ગુજરાતી)
:
अहिल्याबाई होळकरनु चरित्र : भोळाभाई मुन्शी (१८८४) (गुजराती)

Life of Subhedar Malhar Rao Holkar : Founder of the Indore state
(1693-1766 A.D.) : Mukund Wamanrao Burway (1930 (English)

Ahalya Baee: a Poem by Joanna Baillie – 1849

"यशवंतराय महाकाव्य" वासुदेव वामन खरे (१८८८)

सुभेदार थोरले मल्हारराव होळकर यांचे चरित्रमुरलीधर मल्हार अत्रे (१८९३)

-------------------

याव्यतिरिक आपल्याकडे आणखीन काही ऑनलाईन पुस्तकांची link उपलब्ध असल्यास comment च्या माध्यमातून अथवा शक्य असल्यास s.a.shendge@gmail.com  वर Email करावी ही विनंती जेणेकरून वरील यादी Update करता येईल...


- सचिन शेंडगे (९८६०३२४३८४)